Tuesday, August 11, 2020

जगत्कल्याणासाठी 'आता विश्वात्मके देवे'चे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त व्यापक, विस्तृत कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची आज जयंती आहे. श्रावण वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आपेगाव या छोट्या गावी झाला. संत ज्ञानेश्वरांच्या जन्मवर्षाबाबत मात्र एकवाक्यता दिसून येत नाही. काही अभ्यासकांच्या मते संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. तर, काहींच्या मते संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इ.स. १२७१ मध्ये झाला, असे सांगितले जाते. ज्ञानेश्वरांचे कार्य अगदी अफाट आहे. जीवनाच्या अवघ्या २० वर्षांमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य व्यापक आहे. माऊलींनी केवळ १६ व्या वर्षी भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त व्यापक, विस्तृत कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...

​बालपण

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे. आदिनाथ - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तिनाथ - ज्ञानेश्वर. आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बापविठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव अशी नावेही वापरल्याचे आढळून येते.

ज्ञानेश्वरी

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. याच ग्रंथाला 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ म्हणजे 'अनुभवामृत' किंवा 'अमृतानुभव' होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथात दहा प्रकरणांमध्ये विभागलेल्या सुमारे ८०० ओव्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

पालखी - अभ्यासे प्रकट व्हावे

​सापशिडी आणि संत ज्ञानेश्वर

अबालवृद्ध अगदी सहज खेळू शकतात, असा खेळ म्हणजे सापशिडी. या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलीय, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. डेन्मार्क जेकॉब यांच्या मदतीने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे जेकॉब यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि 'मोक्षपट' उलगडा गेला. माऊली आणि निवृत्तिनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या सोपानदेव आणि मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून संत ज्ञानेश्वर आणि वडीलबंधू संत निवृत्तिनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते.

पालखी - लोकसंवादी तत्त्वचिंतक

​संत ज्ञानेश्वरांच्या रचना

चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले, असे मानले जाते. मात्र, त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा नामपाठ आहे. हरिपाठात २८ अभंग आहेत. हरिपाठात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी काही अभंग, विराण्या आदी स्फुटकाव्येही रचली आहेत.

पालखी - हरिपाठ - नामभक्तियोग

​जो जे वांछील, तो ते लाहो...

अमृतानुभव ग्रथाच्या रचेननंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या 'तीर्थावली'त या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. यानंतर ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या 'समाधीच्या अभंगां'मध्ये याचे काही संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह अशा सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. 'जो जे वांछील, तो ते लाहो', असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून ज्ञानेश्वरांनी धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाड्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली.

पालखी - ज्ञानाचा सागर

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home