Sunday, August 2, 2020

राम मंदिर निर्माण - श्रावण कृष्ण द्वितीया युगाब्द ५१२२

मंदिर निर्माण - श्रावण कृष्ण द्वितीया युगाब्द ५१२२

करोडो तास, लाखो दिवस , असंख्य महिने , अनेक वर्षे व जवळपास पाच शतके लोटल्यानंतर दोन हजार वीस साली तो दिवस उगवणार आहे . काय आहे या दिवसाचं आगळेपण ? ह्या दिवशी सूर्य पूर्वेलाच उगवणार आणि निसर्गचक्रही नियमानुसार चालणार. मग वेगळे ते काय? अद्भूत ते काय? विलक्षण ते काय? गौरवास्पद ते काय? संस्मरणीय ते काय? 

वेगळे हेच की कित्येक शतकांच्या अन्यायाचे परिमार्जन होणार आहे. 

अद्भूत हेच की जे घडण्याची आस किमान पंचवीस पिढ्यांनी ठेवली ते घडणार आहे. 

विलक्षण हेच की तमाम हिंदू समाजाला ह्याची देही ह्याची डोळा बघायला मिळणार आहे. 

गौरवास्पद हेच की हिंदू समाजाचा आत्मसन्मान परत मिळणार आहे . 

संस्मरणीय हेच की अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची सुरवात ह्या दिवशी होणार आहे. 





अनेक व्यक्तिंबद्दलच्या आठवणी मनात उचंबळून येत आहेत. राम मंदिर आंदोलनाचे सेनानी कै. अशोकजी सिंघल , रामजन्मभूमी न्यास प्रमुख ब्रम्हविलिन महंत रामचंद्र दास , गोरखनाथ पीठाचे प्रमुख ब्रम्हविलिन महंत अवैद्यनाथ , माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी , रामशीलापूजनाची कल्पक योजना राबवणारे रा. स्व. संघाचे प्रचारक कै . मोरोपंत , देशभरातील रथयात्रेचे नेतृत्व करणारे मा. श्री. अडवाणीजी व त्यांचे रथावरचे हनुमान कै. प्रमोदजी , आपल्या झंझावाताने हिंदू मानस ढवळून काढणारे मा. प्रविणभाई तोगडिया , ओजस्वी वाणीने रामभक्तिची ज्योत पेटवणाऱ्या साध्वी ॠतंभराजी व उमा भारतीजी , 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' या शब्दांनिशी मराठी मनात अंगार फुलवणारे मा. कै. बाळासाहेब ठाकरे , ज्यांच्या रक्ताने शरयू लाल झाली ते कारसेवक राम व शरद कोठारी बंधू तसेच हजारो रामभक्त कारसेवक , गुजरामधील सिग्नलफलिया , गोध्रा येथे आगगाडीतील डब्याला ' मानवतेच्या शांतीदूतांनी ' आग लावल्याने जिवंत जाळले गेलेले रामभजनी , देशभरातील लाखो आजी / माजी संघस्वयंसेवक , न्यायालयीन लढाईचे सेनापती मा. सुब्रमण्यम स्वामी , सर्वोच्च न्यायालयात समर्थपणे न्याय्य बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मा . वैद्यनाथन , ऐतिहासिक निर्णय देणारे माजी सरन्यायाधीश मा. रंजन गोगोई , निष्ठा , निर्धार आणि संयम ह्याचे प्रतिक असलेले भारताचे पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदीजी या सर्वांची आठवण हा देश आणि अखिल हिंदू समाज कायमची स्मरणात ठेवेल. 

धर्मांध मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते तसेच मीर बांकी या बाबराच्या सेनापतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर ध्वस्त केले . हिंदू श्रद्धा पायदळी तुडवून तेजोभंग करण्याचे प्रयत्न असहिष्णू विध्वंसकांनी वारंवार केले . सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कै वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नांमुळे झाला आणि दि. पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी श्रीराम मंदिराच्या पुनःनिर्माणाचा शुभारंभ होत आहे. " श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास " सकल हिंदू समाजाच्या आर्थिक पाठबळावर भव्य मंदिराची उभारणी करणार आहे. हिंदू समाज जागृत आहे , विजिगीषू आहे , प्रयत्नशील आहे हे यावरून पुरेसे सिद्ध होते. इ.स. पंधराशे अठ्ठावीसमधे बाबराने हिंदूंच्या माथी मारलेला कलंक चारशे ब्याण्णव वर्षांनंतर पुसला जाणार आहे . 

आदर्श राज्यकारभार करून रामराज्य स्थापन करणारे , महापराक्रमी रावणाचा पराभव केल्यावर त्याचा बंधू बिभिषणाला सिंहासनावर बसवणारे एकवचनी , चापबाणी प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत. भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत. 'आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे ' हे रामदासस्वामींचे शब्द मराठी ह्रदयात कायमचे कोरलेले आहेत. रामनामाचा महिमा अपार आहे . एखाद्यास भेटलो की राम राम आणि अंतिम यात्रेतही राम राम इतका आपल्या रोमारोमात " राम " आहे. 

जिथे रामजन्म झाला ही करोडो हिंदूंची श्रद्धा आहे , जिथे श्रीरामाचे मंदिर होते हे न्यायालयात सिद्ध झाले आहे , त्याच जागी श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे . हा उत्सव दिवस आहे. कार्तिक महिन्यातील दिवाळी ह्या वर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण द्वितियेला आली आहे. हा दिवस दीपोत्सव म्हणून साजरा करूया . कै. अटलजींच्या 'उस रोज दिवाली होती है ' या कवितेतील एक कडवे, ह्या प्रसंगी आठवते ...

जब प्रेम के दीपक जलते हों
सपने जब सच में बदलते हों,
मन में हो मधुरता भावों की
जब लहके फ़सलें चावों की,
उत्साह की आभा होती है 
*उस रोज़ दिवाली होती है ।

हिंदू समाजाने शपथ घेतली होती , "सौगंध राम की खाते है मंदिर वही बनायेंगे". 

ही शपथ पूर्ण करण्याचे समाधान सर्व राष्ट्रभक्तांना मिळणार आहे. अयोध्येचे श्रीराम मंदिर मिळालं ना आता काशी , मथुरा कशाला अशी कुजबुज सुरू होईल पण जो राष्ट्रासमुदाय आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे स्मरण ठेवतो , तो समाज आत्मसन्मान , आत्मरक्षा आणि आत्मविश्वास जागवतो. 

अयोध्या तो झांकी है काशी , मथुरा बाकीं है । 
जय श्रीराम , जय जय श्रीराम । 

- श्रीराम दांडेकर


Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home