Wednesday, August 26, 2020

गौरीपूजन : कधी होणार गौरी आगमन? जाणून घ्या, शुभ मुहूर्त व विविध पद्धती

गणेश चतुर्थीनंतर गौरींचे आगमन होते. गौरी आगमन, पूजन, विसर्जन असा तीन दिवस चालणारा हा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अगदी उत्साहात साजरा केला जातो. महालक्ष्मी किंवा ज्येष्ठागौरी पूजन कधी करावे? ज्येश्ठागौरीची आरती आणि विसर्जनाची वेळ यांबाबत जाणून घ्या...

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २०२० रोजी गौरी पूजन केले जाणार आहे. गौरी पूजनाचा एकूण उत्सव तीन दिवस असतो. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन कसे करावे? गौरी पूजनाचा विधी, आरती आणि विसर्जनाची वेळ यांबाबत जाणून घेऊया...



गौरीपूजन : कधी होणार गौरी आगमन? जाणून घ्या, शुभ मुहूर्त व विविध पद्धती


अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते. बुधवार, २६ ऑगस्ट २०२० रोजी गौराई किंवा महालक्ष्मीचे पूजन करावे. सकाळी नित्योपचार आटपल्यांतर गौरी वा महालक्ष्मीचे आवाहन करावे. यानंतर षोडशोपचार पूजा करावी. पूजा झाल्यावर आपापल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी.


नैवेद्यांचे विविध प्रकार


रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.


गौरीची आरती


भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा, अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा ।


गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१।।

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी ।


कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेवी जयदेवी ।। धृ।।


ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा, षडरस पक्वान्ने होती सुखधामा ।


सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।


जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।


उत्थापन मूळावर होता अगजाई, वर देती झाली देवी विप्राचे गृही ।

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी०।।


गौरी विसर्जन


तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गुरुवार, २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनंतर ज्येष्ठागौरी विसर्जन करावे. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते, अशी समजूत आहे.

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home