श्रीविष्णुसहस्रनाम माहात्म्य - स्तोत्र पठनामुळे मनोबल,मन:सामर्थ्य,मनाची प्रसन्नता वाढते.आपला आत्मविश्वास,कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो.जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत येते.संकटांचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते. आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत, स्वस्थ होते.मन शुद्ध होते, इच्छा शक्ती वाढते.सकारात्मकता आणि आशावाद वाढतो.सर्वसामान्य माणसाला संतती,अशुभाचा नाश,सम्पत्ती, यश, आरोग्य,ऐश्वर्य,विजय,मन:शांति ,सुयोग्य जोडीदार, सुखाचा संसार, स्वतः ची वास्तू ,कोर्ट केसेस मध्ये यश,कीर्ती अशा लौकिक फळप्राप्तीची खूप अपेक्षा असते.
ह्या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्घेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच, पण स्तोत्रपाठ करताना अनंत जन्मांमधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार,आत्मज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्रपठन करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे.
विष्णुसहस्रनामाची साधना ही अशीच दिव्य,अद्भुत आहे.उपासनेच्या प्रांतात या विष्णुसहस्रनाम साधनेला प्रचंड महत्त्व आहे.गेल्या साडेपाच हजार वर्षापासून विष्णुसहस्रनामाची उपासना भारत वर्षात अखंड सुरु आहे.महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उप पर्वातील १४९वा अध्याय म्हणजेच श्रीविष्णुसहस्रनाम होय.या अध्यायात १४३ श्लोक आहेत.पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे १३ आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे २२ श्लोक वगळता मूळ विष्णुसहस्रनाम १०८ श्लोकांचे आहे. प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे.
त्यामुळे १०८ प्राणायाम आपोआप होतात.पितामह भीष्म उत्तरायणाची वाट पाहात शरपंजरी पडले होते,तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरुन धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले.
१)आपल्या मते परम धर्म कुठला?२)कोणत्या जपाने मनुष्याची जन्म-मरण बंधनातून सुटका होते?३)सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले?४)सर्वांचा आश्रय कोण? ५)कुणाची स्तुती करावी?६)कुणाची पूजा करावी? या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे विष्णु आणि विष्णुसहस्रनाम! मग या स्तोत्राचे पठन का करायचे?१) आपले जीवनदोष,स्वभावदोष नष्ट करण्यासाठी २)आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी ३)आपल्या परमार्थ उन्नती करिता आपल्यात जी काही कमतरता आहे,त्याची पूर्तता करण्याकरिता. माणसाच्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी भगवन्नाम कार्यरत असते.
करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत विष्णुसहस्रनामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना करत असे. तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत जात असे, तेव्हा वाटेतील पिम्पलाच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे. आयुष्यभर हा क्रम चालला होता.याचा परिणाम असा की धर्मदत्त म्हणजेच पुढील जन्मातील दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे कौसल्या यांच्या पोटी श्रीविष्णुनी स्वतः चा सातवा अवतार जो श्रीराम तो घेतला.
प.पू.श्रीवासुदेवानंद टेम्ब्ये स्वामी,प.पू.शिर्डीचे साईबाबा,प.पू.श्री गुळवणी महाराज,प.पू.मामा देशपांडे महाराज इ. कित्येक संत-सत्पुरुषांनी विष्णुसहस्रनामाची महती वर्णिलेली आहे.आद्य शंकराचार्य यांनी तर महाभारत ही गाय,भगवद्गीता हे तिचे दूध आणि विष्णुसहस्रनाम हे तिचे तूप असा विष्णुसहस्रनामाचा गौरव केला आहे.
हे सर्व संत म्हणतात,श्रीविष्णुसहस्रनामाच्या पठनाने, श्रवणाने, चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटामधून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो.
या स्तोत्राच्या शब्दा-शब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परम मंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे.विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा,वास्तुदोष,पितृदोष,स्वभावदोष नाहीसे होतात.विघ्ने, संकटे दूर पळतात.
१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.
२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो,म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.
३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे
४)एकादशीच्या रात्री १२वाजता स्नान करून विष्णुपुढे(राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको)तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .
५) ४० दिवसांच्या रोज १२वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.
६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.
७)बालकृषणाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते.
८)वास्तु दोष जाण्या करिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत,याची सुरुवात बुधवारीच करावी.तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.
९)बाहेरच्या बाधेचा त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.
१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.
११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.
१२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.१२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.
१३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.
१४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.
१५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत,गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.
१६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४ वेळा नारायण,नारायण,नारायण नारायण असे नाम घ्यावे.(पू.श्री.शिरिषदादा कवडे यांनी लिहिलेल्या श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन काही गोष्टी इथे व्यक्त केल्या आहेत. मी त्यांची कृतज्ञ आहे.)
श्रीविष्णुसहस्रनाम पठन किंवा कोणतीही उपासना करताना काही गोष्टी माझ्यासह सर्वानी केल्या पाहिजेत असे वाटते-१)आत्मपरीक्षण-आपले दोष कठोरतेने ओळखून ते नाहीसे करणे.२)स्वयंसूचना- स्वतः च्या पारमार्थिक कल्याणासाठी स्वतःला सुधारण्याच्या दृष्टीने स्वतः ला सूचना देणे.३)शरणागती-भगवंताला सम्पूर्ण समर्पित भावाने शरण जाणे ४)कर्मफलत्याग-आपली पुण्य कर्मे ईश्वराला समर्पित करावीत आणि पापकर्मांची मन:पूर्वक जाणीव स्वतः ला करून देऊन पश्चात्ताप आणि प्रायश्चित्त करावे.५) क्षमा प्रार्थना-माझ्या इह जन्मातील आणि या आधीच्या सर्व जन्मामधील माझ्याशी संबंधीत सर्व जीवात्म्याना मी दुखावले असेल तर मी त्यांची क्षमा मागतो/मागते आणि मला कोणी दुखावले असेल तर मी त्यांना क्षमा करतो/करते.अशांने कर्म बंधनाच्या विळख्यातून आपली मुक्तता होते.६)रोज ठराविक उपासना,ठराविक वेळ,ठराविक जागा आणि ठराविक मूर्ती असावी.७)रोज किमान अर्धा तास प्राणायाम आणि अर्धा तास ध्यान (Meditation) करावेच.८)कोणतेही कर्म केले की श्रीकृष्णार्पण मस्तु असे म्हणावेच.९)आपले कुलधर्म, कुलाचार,गुरु उपासना,देवपूजा हे करावेच ,कारण संसारी माणसाला विहित नित्य कर्म चुकलेले नाही, पण ते करतानाही श्रीकृष्णार्पण मस्तु असे म्हणावे.
आराध्यदेव मात्र विष्णु असावेत.समजा विष्णु सोडून इतर कोणतेही आराध्यदैवत असले तरी ही काही बिघडत नाही.
कारण आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं। सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति।।
डॉ. अपर्णा कल्याणी,सोलापूर
Labels: General information