Sunday, November 29, 2020

वैकुंठ चतुर्दशीची माहिती

November 28, 2020.

आज वैकुंठ चतुर्दशी. कार्तिक शुध्द चतुर्दशीस विष्णु आणि शंकर यांची मध्यरात्री आवळीच्या झाडाखाली भेट होते. यास हरीहर भेट असे ही म्हणतात. ब्रह्मदेवास दोन पत्नी आहेत, सावित्री आणि धात्री. त्यापैकी धात्री ही आवळीच्या झाडाच्या स्वरूपात पुजली जाते. 


वामन अवतारात बळीस पाताळात घातल्या नंतर बळीला दिलेल्या वराप्रमाणे श्रीविष्णु हे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या काळात देव पाताळात बळी कडे असतात. त्यामुळे या काळात असुरी शक्तींचा प्रादुर्भाव जास्त असतो, व त्याचा त्रास मनुष्यास होऊ नये म्हणुन व्रतवैकल्ये केली जातात. या काळात विष्णु आपली पालन पोषणाची जबाबदारी शंकरांकडे सोपवितात. वैकुंठ चतुर्दशीस शंकर ही जबाबदारी परत विष्णुकडे देऊन आपण तप करण्यास निघुन जातात , ती भेट म्हणजेच हरीहर भेट. काही ठिकाणी असे ही मानले जाते की, मोहिनीरुप धारण केल्यानंतर विष्णुंनी मोहिनीरुप त्यागून शंकराची जी भेट घेतली ती हरीहर भेट. 

वैकुंठ चतुर्दशी ही अतिशय शुभ आणि पुण्यप्रद आहे. या दिवशी मध्यरात्री श्रीविष्णुना बेल व शंकरास तुळस अर्पण केली जाते. तसेच आजच्या दिवशी वृन्दा म्हणजे तुळस आणि शाळीग्राम यांचेही पुजन केले जाते. आज पार्वती देवीस जव या धान्याची भाकरी करुन नैवेद्य दाखविला जातो, त्यामुळे किडणीशी संबधित सर्व विकार नष्ट होतात. 

एकुणच वैकुंठ चतुर्दशीस विष्णु आणि महादेव यांच्या पुजनाने भक्तास वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. विष्णुना एकसहस्र कमळ अर्पण करण्याचीही पध्दत आहे.

आजच्याच दिवशी पितरांच्या मुक्तीसाठी क्षेत्राच्या ठिकाणी तर्पण देण्याचीही प्रथा आहे, कारण महाभारतात मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या मुक्तीसाठी भगवान कृष्णाने आजच्याच दिवशी श्राध्द करुन तर्पण दिले होते.

आज उज्जैन व काशी येथे हरीहर भेटीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

थोडक्यात, आज वैष्णवी व शिव शक्ती एकाकार होतात. 

याचाच अर्थ विष्णु शिव ही रूपे दोन आहेत, पण शक्ती एकच आहे, या एकाकार शक्तीचा उत्सव आपण साजरा करतो. परंतु आपल्या समाज रचनेत अजुनही विष्णु मोठे की शंकर मोठे यावरुन मतभेद, वाद , संघर्ष देखील होतात. परंतु, जेथे ईश्वरी शक्तीनेच स्वतः मध्ये भेद केला नाही, त्याचा भेद करणारे आम्ही कोण? परंतु अज्ञानी मनुष्यास हे कळत नाही. 

ईश्वरी शक्ती ही अभेद्य, निर्गुण, निराकार असुन ईश्वरी लीला करण्यासाठी त्या शक्तीने अनंत रुपे धारण केली आहेत. आज वैकुंठ चतुर्दशीच्या पुण्यप्रद मुहूर्तावर त्या एकाकार महाशक्तीस आपण शरण जाऊया व त्या शक्तीस साष्टांग दंडवत घालुया.

श्रीगुरुदेव दत्त.

(प्रज्ञा बर्डे यांच्या सौजन्याने)

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home