श्रावण महिना माहिती
अत्यंत पवित्र श्रावण महिन्याचा शुभेच्छा
हिंदू पंचांगाचा प्रारंभ चैत्र मासापासून होतो. चैत्र मासापासून पाचवा महिना हा श्रावण मास असतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यातील पौर्णिमे पासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग तयार होत असते. त्यामुळे श्रावण नक्षत्राच्या नावा वरुन या महिन्याचे नाव श्रावण असे ठेवण्यात आले. या महिन्या पासून चातुर्मासची सुरूवात होते. तसेच हा महिना चातुर्मासातील चार महिन्यापैंकी अतिशय शुभ असा महिना मानला गेला आहे.धार्मिक द्दष्टीने चातुर्मासाचे खुप महत्व आहे.
चातुर्मासात येणा-या चार महिन्यात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांमध्ये संत-महात्म्यांपासून ते साधारण व्यक्तीपर्यंत सगळेच धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमात व्यस्त झालेले आपल्याला दिसतात. या काळात हिंन्दू धर्मात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. या सर्वांची सुरूवात श्रावण महिन्यापासूनच करण्यात येते.
आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एकसण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहितीमिळवली जाते.श्रावण महिन्यात रविवारी सुर्यनारायणची पुजा, नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत.
श्रावण महिन्यातील नाग पंचमी हा दिवस स्त्रीयासाठी मोठा सण आहे तसेच महाराष्ट्रात हा सण आनंदाने साजरा करतात. ह्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया वारुळा जवळ जावून पूजा करायच्या पण आता कालांतराने व शहरी करणामुळे वारुळे राहिली नाहीत. म्हणून आताघरीच नागाची मूर्ती तयार करून, किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते.
नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वाफुले वाहून, लाह्या व दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. ह्या दिवशी नागाची पूजा का करायची तर नाग देवता आपल्या कुळाचा, आपल्या पूर्वजांचा व आपल्या घराण्याचा रक्षण कर्ता आहे म्हणून आपण नाग देवाची पूजाकरतो. त्या दिवशी नाग देवाच्या फण्याला दुखवायचे नसते. त्या दिवशी वाटणे घाटणे करायचे नाही, विस्तवावर तवा ठेवायचा नाही. त्या दिवशी पुरणाची दिंड बनवून नैवेद्य बनवला जातो.
नाग पंचमी ह्या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. लहान मुलीनं पासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये भाग घेतात. ह्या दिवशी रात्री जागरण केले जाते.
श्रावणातील सोमवार ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून शंकर भगवान् यांची पूजा केली जाते. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा करून गोडाचा नेवेद्य बनवून मग उपवास सोडला जातो.
श्रावणातील मंगळवार हा तर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी आनंदाचा दिवस. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी करतात. ह्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येवून शंकरा भगवानच्या पिंडीची पूजा करून स्त्रीयांना हळदी कुकवाला बोलवून रात्री जागरण केले जाते. पहिल्या वर्षी पहिला मंगळवार माहेरी आईच्या घरी करतात. व नंतर पाच वर्ष सासरी करतात व शेवटच्या वर्षीउद्यापन करतात. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, लाटण्याचा खेळ, गोफ, फेर हे खेळ खेळतात. खेळ खेळतांना गाणी म्हणतात.
नवीन लग्न झालेल्या मुलींना पतीचे नाव हे उखाण्यात घेण्याचा आग्रह धरला जातो. मंगळा गौरीला खेळ खेळतांना मुली आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेतात.
नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोक मनवतात. ते आपल्याला रोजी रोटी देणाऱ्या समुद्राची पूजा करतात व नारळी पौर्णिमा हा दिवसनाच-गाणी म्हणून साजरा करतात. तसेच रक्षा बंधन हा सण महाराष्ट्रीयन लोकांचाआहे त्यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची हमी देतो.
श्री कृष्ण जन्मउत्सव: श्री कृष्ण जन्म हा रात्री साजरा केला जातो. त्या दिवशी उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी दही हंडी हा सण साजरा केला जातो.
धार्मिक कार्ये -
१) प्रत्येक सोमवारी - शिवपूजन
२) प्रत्येक मंगळवारी - मंगलागौरीचे पूजन
३) प्रत्येक बुधवारी - बुधाचे पूजन
४) प्रत्येक गुरुवारी - बृहस्पतीचे पूजन
५) प्रत्येक शुक्रवारी - देवीचे पूजन
६) प्रत्येक शनिवारी - शनि-मारुति-अश्वत्था(पिंपळा)चे पूजन
७) प्रत्येक रविवारी - आदित्याचे पूजन