तुळशीचा विवाह माहिती


ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. 

ज्योत्स्ना गाडगीळ 




श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात.

तुळशी विवाहाची आख्यायिका :

जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. 

तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व : तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.  

तुळशीची आरती :

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।

तुळशी विवाहाची पद्धत :

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वरील दिवशी तिचे लग्न लावतात. 

विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.

Comments