*घटस्थापना*
*नमस्कार यावर्षी घटस्थापना निज अश्विन प्रतिपदा शके १९४२ दिनांक १७/ १०/ २०२० शनिवारी सकाळी सूर्योदयापासून अकरा वाजून पाच मिनिटे पर्यंत पुण्यकाल आहे .* *महाष्टमी उपवास दि.२४ अक्टोबर , शनिवारी करावा . नवरात्रोत्थापन (नवरात्र उठणे ) व विजयादशमी दि.२५ अक्टो रविवारी आहे . विजय मूहूर्त दुपारी २ वाजुन १८ मिनीटा पासुन दुपारी*
*३ वाजुन ४ मिनीटा पर्यंत आहे .*
*घटस्थापना*
*हे व्रत आश्विन शु. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत करतात. व्रताला आरंभ करण्यास अमायुक्त प्रतिपदा वर्ज्य समजावी.* *द्वितियायुक्त प्रतिपदा शुभ समजावी. व्रताच्या नऊ रात्री पूर्ण होतील तेव्हा व्रत पूर्ण झाले असे जाणावे. तिथीच्या क्षयवृद्धीने दिवससंख्येत न्यूनाधिक्य होत नाही.* *आरंभदिवशी चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग असेल तर दोन्ही संपल्यावर व्रतारंभ करावा. परंतु देवीचे आवाहन, स्थापन आणि विसर्जन या तिन्ही गोष्टी प्रात:काळी करतात. म्हणून चित्रादी वर्ज्य गोष्टी अधिक काल राहात असतील तर त्याच दिवशी अभिजित् मुहूर्तावर आरंभ करावा. तसे पाहिले तर, वासंतिक नवरात्रामध्ये शक्तीची उपासना प्रधान गणली जाते. परंतु या दोन्ही उपासना व्यापक असल्यामुळे दोन्ही नवरात्रांत दोन्ही करतात. याबाबतीत वर्णभेद, विधानभिन्नता अगर देवतादी भेद नाही. सर्व वर्णाचे लोक आपापल्या अभिष्ट देवतेची उपासना करतात. जर संपूर्ण नवरात्रभर व्रत करणे अशक्य असेल तर*
*प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत सप्त-रात्रिक व्रत करावे.*
*पंचमीला एकभुक्त राहून, षष्ठीला नक्तव्रत करून (तारकादर्शनोपरान्त भोजन करून), सप्तमीस अयाचित सेवन करून, अष्टमीला व नवमीला पारणे करून पंचरात्रिक व्रत करावे;*
*सप्तमी, अष्टमी व नवमीला एकभुक्त राहून त्रिरात्रिक व्रत करावे;*
*आरंभदिनी व समाप्तिदिनी द्विरात्रिक व्रत करावे किंवा*
*आरंभदिनी अगर समाप्तिदिनी एकरात्रिक व्रत करावे* *व्रत कोणत्याही प्रकारे केले तरी अभिष्ट-सिद्धी होते.* *सुरुवातीस मृत्तिका पसरून एक वेदी (चौक) तयार करावी.* *त्यासाठी पवित्र स्थान निवडावे. त्या वेदीवर जव, गहू आदी धान्ये पेरावीत. त्यावर शक्तिनुसार सुवर्णादीचा कलश स्थापित करावा. कलशावर सोने, चांदी, तांबे, मृत्तिका, पाषाण याची मूर्ती किंवा चित्र याची स्थापना करावी. जर मूर्ती मातीची, कागदाची (चित्ररूपिणी ) किंवा शेंदुरादिकाची असेल व स्नानादी विधींनी ती विद्रूप होण्याची वा विरून जाण्याची शक्यता असेल तर तिच्यावर काच बसवावी आणि खड्गादी आयुधे आतीला बाजूस ठेवावी. मूर्ती उपलब्ध होण्यासारखी नसेल तर कलशाच्या मागील बाजूस (भिंतीवर) स्वस्तिक व त्याच्यामागे दोन्ही बाजूंस त्रिशूळ काढावे आणि दुर्गाचे चित्र, पुस्तक किंवा शाळिग्राम वगैरे ठेवून विष्णुचे पूजन करावे. पूजेचे सात्त्विकी, राजसी आणि तामसी असे तीन प्रकार आहेत. यांपैकी सात्त्विकी पूजा अधिक प्रचलित आहे. नवरात्र-व्रताचा आरंभ करताना सर्वप्रथम गणपती, मातृका, लोकपाल, नवग्रह आणि वरुण यांचे पूजन, स्वस्तिवाचन आणि मधुपर्क- ग्रहण करून मुख्य मूर्तीची वेदविधीनुसार, पद्धतिक्रमानुसार किंवा आपल्या सांप्रदायिक पद्धतीनुसार पूजा करावी. ही मुख्य मूर्ती राम-कृष्ण, लक्ष्मीनारायण किंवा शक्ती, भगवती, देवी इ. कोणत्याही अभिष्ट देवतेची असावी. देवीच्या नवरात्रात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अणि सप्तशतीचा पाठ या गोष्टींना प्राधान्य आहे. पाठ करायचा असेल तर पाठ्यपुस्तक देवतातुल्य मानून त्याचे पूजन करावे. १, ३, ५ अशा विषम संख्यात्मक सप्तशतीची पारायणे करावी. पाठासाठी विशेष ब्राह्मण निमंत्रित करणे असतील तर त्यांची संख्याही १, ३, ५ अशी विषम असावी. सप्तशतीचे पाठ (पारायणसंख्या) आपल्या उद्दिष्टाच्या स्वरूपानुसार पुढीलप्रमाणे करावे.*
*फलसिद्धी १,*
*पद्रव-शांतीसाठी ३,*
*सामान्यत: सर्व प्रकाराच्या शांतीसाठी ५,*
*भयमुक्तीसाठी ७,*
*यज्ञ-फलाच्या प्राप्तीसाठी ९,*
*राज्यप्राप्तीसाठी ११,*
*कार्यसिद्धीसाठी १२,*
*एखाद्याला वश करण्यासाठी १४,*
*सुखसंपत्तीच्या प्राप्तीसाठी १५,*
*धनपुत्रप्राप्तीसाठी १६,*
*शत्रू, रोग आणि राजा यापासूनच्या भयनिवारणासाठी* *१७,*
*प्रियप्राप्तीसाठी १८,*
*अनिष्ट ग्रहांच्या दोष* *निवारणासाठी २०,*
**बंधमुक्तीसाठी २५,*
*आणि मृत्युभय, व्यापक उपद्रव, तसेच देशविनाश इत्यादीपासून बचाव व्हावा आणि असाध्य गोष्टीच्या सिद्धीस्तव, तसेच लोकोत्तर लाभास्तव,* *आवश्यकतेनुसार १००; १०००; दहाहजार, व एक लाखपर्यंत सप्तशतीपाठ करावे. देवीव्रतांमध्ये 'कुमारीपूजन' परमावश्यक मानले गेले आहे.* *शक्य तर नवरात्र संपेपर्यंत, नाही तर समाप्तीच्या दिवशी कुमारीचे पाय धुऊन तिची गंधपुष्पादींनी पूजा करावी. तिला मिष्टान्न भोजन वाढावे.*
*एका कुमारिकेचे पूजन केले असता ऎश्वर्यप्राप्ती होते;*
*दोघींचे पूजन केले असता भोग व मोक्षप्राप्ती होते;*
*तिघींचे पूजन केल्याने धर्म-अर्थ-काम यांची प्राप्ती होते;*
*चौघींच्या पूजनाने राज्यपदप्राप्ती;*
*पाच जणींचे पूजन केल्याने विद्याप्राप्ती;*
**सहांच्या पूजनाने षट्कर्मसिद्धी;*
**सातांच्या पूजनाने राज्यप्राप्ती;*
*आठजणींच्या पूजेने संपत्ती आणि*
*नऊ कुमारींची पूजा केली असता पृथ्वीचे राज्य मिळते.*
*दोन वर्षांची मुलगी कुमारी, तीन वर्षांची त्रिमूर्तिनी, चार वर्षांची कल्याणी, पाच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची काली, सात वर्षांची चण्डिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा-स्वरूपिणी संबोधिली जाते.* *कुमारीपूजनासाठी याहून मोठी मुलगी अग्राह्य होय. दूर्गापूजेमध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये-आवळा, सुगंधी तेल, इ. वहावीत, द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वहावा, तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा, चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन, पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार आणि षष्ठीला फुले अर्पण करावीत. सप्तमीला गृहमध्यपूजा, अष्टमीला उपवासपूर्वक पूजन, नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि दशमीला आरती आणि विसर्जन करावे*. *याचप्रमाणे रामकृष्णादींच्या नवरात्रमहोत्सवात स्तोत्रपाठ किंवा लीलाप्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. हा सर्व उल्लेख केवळ दिग्दर्शनात्मक आहे. तरी विशेष गोष्टींची माहिती अन्य ग्रंथांमधून अवगत करून घ्यावी. याप्रमाणे नऊ दिवसपर्यंत नवरात्रव्रत करून दहाव्या दिवशी दशांश हवन, ब्राह्मणभोजन आणि व्रतोद्यापन ( विसर्जन ) करावे.*
*यावर्षी विजयादशमी नवव्या माळेला असून त्यादिवशी पारणे करावे . उद्या घटस्थापना झाली तरी मातामह श्राद्ध करू शकता . ज्यांना घटस्थापने पूर्वी अशौच आले असेल म्हणजे सुतक पडले असेल तर त्यांनी अशौच संपल्यावर तिसऱ्या , पाचव्या , सातव्या अगदी नवव्या दिवशीसुद्धा घटस्थापना केली तरी चालते . घटस्थापना झाल्यावर अशौच आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून किंवा ब्राह्मणाकडून उर्वरित दिवशी आरती , तेलवात करून घ्यावी .* *उस्थापन सुद्धा दुसऱ्याकडून करून घ्यावे .*
*कोरोनामुळे कुणी आजारी असल्यास किंवा ऍडमिट असल्यास घट बसवणे शक्य नसल्यास निदान नऊ दिवस देवापुढे दिवा लावून देवीचा अखंड जप करावा . या नऊ दिवसात देवीची स्तोत्रे , आरत्या , पदे , सप्तशती पाठ करावे या नऊ दिवसात नवचंडी शतचंडी करता येते.*
*प्रश्न :-* *यावर्षी अडचणीमुळे महालक्ष्मी बसवता आल्या नाहीत तर त्या नवरात्रात बसवाव्या का ?*
*उत्तर :-* *महालक्ष्मी हे व्रत आहे , कुलधर्म नाही . त्यामुळे एखाद्या वर्षी व्रताचा लोप झाला तरी पुढील वर्षी महालक्ष्मी बसवाव्यात . महालक्ष्मी आगमन अनुराधा नक्षत्रावर होते , पूजन जेष्ठा नक्षत्रावर होते आणि उत्थापन मूळ नक्षत्रावर होते , हे योग परत कसे जुळून येतील ? त्यामुळे आता पुढील वर्षी महालक्ष्मीची स्थापना करावी*
*प्रश्न :-* *नवरात्रीमध्ये कोणतेही पारायण करता येते का ?*
*उत्तर :-* *पारायण अवश्य करावे , कारण सर्वांना उपवास असतो व वेळ भरपूर असतो . नऊ दिवसांमध्ये उलट परमेश्वराचे गुणगान अवश्य करावे .*
*प्रश्न :-* *नवरात्रीमध्ये परिधान करण्यासाठी साड्यांचे रंग कोणते ?*
*उत्तर :-* *आपल्या धर्मशास्त्रात नवरात्रात नऊ रंगाचे कपडे परिधान करावेत असे कुठेही उल्लेख नाहीत . साड्यांचे कारखानदार , दुकानदार , यांचे हे जाहिरातीचे फ़ंडे आहेत त्याला काही शास्त्राधार नाही .*
*प्रश्न :-* *आजारपणामुळे नऊ दिवस उपवास शक्य नाहीत तर काय करावे ?*
*उत्तर :-* *उपवासाचे उपोषण , एक भूक्त यापैकी कोणताही प्रकार चालतो . म्हणजे एक वेळ जेवण करून सुद्धा उपवास करता येतो .*
*प्रश्न :-* *नवरात्र मध्ये पानाचा विडा देवीला दिल्यावर उपवास असताना तो कसा ग्रहण करावा ?*
*उत्तर :-* *वर्षभर उपवासामध्ये पानाचा विडा चालत नाही . पण नवरात्रीचा उपवास असला तरी देवीचा प्रसाद म्हणून विडा ग्रहण करावा .*
*प्रश्न :-* *आमच्या घरी नवरात्र नाही तर आम्ही सुरु करू शकतो का ? किंवा आमच्याकडे अष्टमीला हवन करत नाहीत यंदा केले तर चालेल का ?*
*उत्तर :-* *कुलाचार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे तसा चालवावा . त्यामध्ये अधिक भर घालण्याचा प्रयत्न करू नये तुम्हाला आज चांगले दिवस आले आहेत म्हणून त्या भर घालू नये , कारण दिवस सारखे नसतात . प्रथम वाढ करून नंतर सोडून देण्यापेक्षा वाढ करूच नये . कारण पुढील पिढीने योग्य पद्धतीने केले तर ठीक अन्यथा त्यांना त्रास होतो .*
*प्रश्न :-* *नंदादीपातील वात कोणती असावी ? तेल कोणते असावे ? वात किती लांब असावी ?*
*उत्तर :-* *( मूळ शब्द आनंद दीप असा आहे पण सध्या सर्वजण नंदादीप असाच उल्लेख करतात .)*
*वात एकच असावी वातीची लांबी ९६ अंगुले असे प्रमाण सांगितले आहे . आपण स्वयंपाकाला वापरतो तेच तेल दिव्या साठी वापरावे . रात्री दिवा विझला तरी उठल्याबरोबर तेल टाकून दिवा लावावा व नंतरच इतर कामे करावीत . नंदादीप पडला तर शांती करून घ्यावी . तुपाचा दिवा पण लावता येतो .
*************************************************
Labels: how to worship